Wednesday 1 June 2011

सांज...

स्मरणाच्या रात्रीत उमलाना-या आठवणींच्या सुमनांना ,
अंधाराच्या रेतीत किणकिणते काजव्यांच्या लहरी,
महामेघ क्षितिजाच्या जांभळ्या सरितेची किरणे,
चौफेर सजावती जणू जन्माजन्माच्या  प्रहरी...!

नादलहरींच्या प्रवाहात विरले काळाच्या ओघाचे कलश,
 उसासे टाकले अर्धांगाने, थकली धावणारी नजर,
खडकांच्या छिद्रातून उजळले स्मरणयुगांचे तवपालाश,
तुडवलेल्या वाळवंटात उगवली आप्तांच्या निमिषांची झालर...!

कातरवेळेच्या कुरणात हरवली बागडणारी कोवळी हरिणे,
झेपावणा-या भास्कराची लोपली गारठलेली विदेही रंगदर्शने,
मांडीवर निजलेल्या पाडसाला, आईने जुळवले खेळणे,
गळलेल्या नक्षत्रांची शिखरे करीती हरिणांना मार्गदर्शने...! 

वाकलेल्या दिशांची सावली दुरून भासली सावळी,
ओंजळीच्या कडातून दिसती निसटलेल्या कमळांच्या खळी,
वसंताच्या हुकुमाने थिरकली नव प्राजक्तांची मंद वीणा,
अचल मेघांच्या मंदिरी पोरकी आपलेपणाची भावना...!


P.S : पल्लवी,अमृत,प्राजक्ता आणि श्रुती साठी...
         9:३०,१/०६/२०११, पुणे.